- औषधोपचाराने बाबा -प्रमोद देशमुख जगत आहेत सामान्य आयुष्य
- डॉ. बोधनकर, डॉ. काकडे आणि डॉ.चिरडे यांनी वाचवले बाबांचे प्राण
किडनी तज्ञ डॉ. प्रणित काकडे हे आमच्या यवतमाळ शहरात आठवड्यातून एकदाच येतात. मात्र त्यांची ही एक भेट माझ्या बाबांना नवजीवन देणारी ठरली! पुढे बाबांना तब्येतीच्या अडचणी आल्या आणि सर्जन डॉ.यशोधन बोधनकर, किडनी तज्ञ डॉ.प्रणित काकडे आणि युरोलोजीस्ट डॉ. प्रतिक चिरडे यांनी बाबांचे प्राण वाचवले. आज बाबा आम्हाला दिसत आहेत ते या डॉक्टर त्रयीमुळे!
सर्वसाधारण, मध्यमवर्गीय परिवार आमचा. माझे बाबा प्रमोद देशमुख हे राज्य परिवहन महामंडळात ३६ वर्षे नोकरी करून निवृत्त झाले. नेर परसोपंत गावी आम्ही राहतो. गेल्या ६-७ वर्षात त्यांना मधुमेह जडला. औषध घेत शांतपणे निवृत्तीचे काळात ते असताना गत वर्षी त्यांना दिवाळीच्या सुमारास कंबर दुखणे सुरु झाले. थकवा, चालताना दम लागणे, वरचेवर लघवी लागणे असा त्रास सुरु झाला. त्यांच्या अंगावर सुज येऊन वजन वाढले. गळून गेल्याने आम्ही जवळचे यवतमाळ शहर गाठले. मात्र गुण येऊन बरे वाटण्याऐवजी विपरीतच घडले. बाबांची लघवी बंद झाली. ते अस्वस्थ झाले. तेव्हा ज्या डॉक्टरांकडे आम्ही औषधोपचार घेत होतो, त्यांनीच आम्हाला डॉ.प्रणित काकडे जे अमरावतीच्या डॉ. हेडगेवार हॉस्पीटलमध्ये किडनी तज्ञ म्हणून सेवा देतात त्यांच्याकडे पाठवले. डॉ. काकडे यांनी काही तपासण्या सांगितल्या आणि औषधे सुरु केले. नंतर डायलिसिस सुरु केले . तेव्हा आम्ही घाबरलो. कारण एकदा असे उपचार सुरु झाले की ते बहुतेक रुग्णांना शेवटच्या श्वासापर्यंत द्यावे लागतात, ही धारणा असते. पैसा इतका आणायचा कोठून ? त्यातच माझ्या बहिणीचे लग्न ठरले होते. ही सगळी परिस्थिती त्यांना सांगितली. सुदैवाने तिच्या सासरचे समजूतदार आहेत. हे सगळे पाहून शेवटी लग्न पुढे ढकलले.
बाबांना डायलिसिस उपचार सुरु झाले. ते तीन आठवडे भरती होते. पण जनरल वार्ड मध्ये होते. आयसीयुची कायम गरज त्यांना लागली नाही आणि दवाखान्याने विनाकारण तसे केलेही नाही. माझी ताई अमरावतीमध्ये राहते त्यामुळे कधी डबा तिकडून तर कधी नेरला गेलो की आणत होतो. शिवाय दवाखाना म्हटले की रुग्णाच्या नातेवाईकांना राहण्याचा मोठा प्रश्न असतो. पण आयसीयु मध्ये रुग्णांच्या आप्तांना राहण्यासाठी छान व्यवस्था आहे. काळजी घेणारा आणि प्रेमळ कर्मचारी आहेत. काही टेस्ट, औषधे, पथ्य आणि उपचाराला प्रतिसाद यामुळे ते बरे होवू लागले. आणि आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसला! केवळ तीन डायलिसिस नंतर डायलिसिस बंद झाले व बरे होवून घरी आले. आम्ही सगळे आनंदलो.
मात्र काही दिवसांनी बाबांना प्रोस्टेटचा त्रास सुरु झाला. डॉ.चिरडे सरांनी तपासणी केली असता ते म्हणाले, प्रॉस्टेट कॅन्सरची दाट शक्यता आहे. त्यासाठी रक्ताची चाचणी, बायोप्सी, तपासणी अशा चाचण्यांचा समावेश असतो. सतत लघवीला जावं लागणं, लघवीच्या वेळेस ताण येणं, लघवी पूर्ण झाली आहे असं न वाटणं, हा त्रास असल्याने बायोप्सी केली असता दुर्दैवाने तो कॅन्सर निघाला. डॉक्टरांनी MRI सोबत इतर चाचण्या करुन सुचविले की हा कॅन्सर शरीरात पसरला आहे.तेव्हा अंडकोष ग्रंथी शस्त्रक्रीयेद्वारे काढून टाकणे, हा उपाय डॉक्टरांनी आम्हाला सुचवला. आम्ही डॉक्टरांवर सर्व सोपविले आणि निर्धास्त झालो. कारण आपल्याला अशा वेळी दुखण्यातून बरे करणारे डॉक्टरच असतात. डॉ. चिरडे सर नेमके या काळात नसल्याने डॉ.यशोधन बोधनकर सरांनी सर्जरी केली आणि मॉनिटरिंग केले. सुदैवाने बाबांचे क्रिएटीनिन कमी झाले, सुज उतरली, वजन आटोक्यात आले. पूर्वी बाबा तंबाखू खात असत. तो त्यांनी बंद केला. त्यांची चिडचिड झाली पण स्वतःच्या कुटुंबाच्या काळजीपोटी त्यांनी संयम राखला आणि ते पुन्हा एकदा ठणठणित झाले.
आता किडनी फंक्शन आणि क्रीएटीनिन डॉ.काकडे सर पाहतात तर लघवी नीट होते की नाही, मेल हार्मोन्स, वजन, कॅन्सर या बाबत डॉ. चिरडे सर काळजी घेतात. डॉक्टरांनी आम्हाला घरी काळजी घ्यायला सांगीतलीय. बाबा पडायला नकोत. कारण या आजारात हाडे ठिसूळ होतात. पडले तर समस्या नको यासाठी ही काळजी घ्यावी लागते. सर म्हणाले, बाबांचा आहार, वजन, पथ्य याबाबत काळजी घ्या. त्यांनी प्राणायाम करणे गरजेचे आहे आणि आता यापुढे कोणतेही व्यसन नको... यासाठी आम्हीही दक्ष असतो. आई, ताई आणि मी यासाठी त्यांना सपोर्ट करतो.
कॅन्सरग्रस्त ठरलेले बाबा डायलिसिस, ऑपरेशन नंतर औषधोपचार घेत आज सामान्य आयुष्य जगत आहेत. आम्ही देशमुख कुटुंबीय परमेश्वर आणि डॉ. बोधनकर, डॉ. प्रणित काकडे व डॉ. चिरडे सर यांचे नेहमी ऋणी राहू.
वैभव प्रमोद देशमुख,
नेर परसोपंत, जि. यवतमाळ