चहा हा चहाप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. हॉटेल, चहाची टपरी किंवा तंदुरी चहाचे दुकान असे अनेक पर्याय चहाप्रेमींसाठी उपलब्ध असतात. दिवसाची सुरुवात सुंदर आणि आइतिल्हाददायी व्हावी असे सगळ्यांना वाटते. मुळात चहा पिण्याची सुरुवात भारतात झालेली नसली तरी चहा आता भारतीयांचं लोकप्रिय पेय आहे. जगात सगळीकडे चहाप्रेमी भेटतीलच. आज पहाट होते ती विविध फ्लेवरच्या चहाने ! जगाला वेड चहाचा शोध चीनमध्ये अगदी अपघाताने लागला. गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटनला अपघाताने लागला, अगदी तसाच चहाचा शोध लागला !! शीन नुंग नावाच्या राजाच्या गरम पाण्याच्या कपात नजरचुकीने चहाचे वाळलेले पान पडले आणि त्या पाण्याचा रंग बदलला. राजाने या पाण्याची सहज चव घेतली तेव्हा त्याला तो स्वाद खुपच आवडला आणि त्यातून चहाचा शोध लागला.
घरं असो किंवा चहा शॉप यामध्ये विविध स्वरूपात चहा हे पेय प्यायलं जातं. ब्रिटीशांनी १८३६ मध्ये भारतात आणि १८६७ मध्ये श्रीलंकेत चहाचे उत्पादन सुरू केले. पूर्वी लागवडीसाठी बियाणे चीनमधून येत होते, परंतु नंतर आसाम चहाचे बियाणे वापरले जाऊ लागले. ब्रिटीश बाजारपेठेतील चहाची मागणी पूर्ण करण्यासाठी चहाचे मूळ भारतात उत्पादन केले गेले. चहा आज इतका लोकप्रिय झाला आहे की, जगभरात “इंटर नॅशनल टी डे“ साजरा केला जातो.
चहा किती आवडतो पहा,
गोडवा तिच्या स्मितहास्याचा भरभरून असायचा
विना साखरेचा चहा पण तिच्या हातून गोड व्हायचा.
जगभरात चहाचे शौकीन कोट्यावधींच्या संख्येने आहेत आणि अनेकजण त्यांच्या दिवसाची सुरवात “एक कप “चहानेच करत असतात. आज पाण्यानंतर जगात सर्वाधिक कुठले पेय प्यायले जात असेल तर ते आहे चहा ! सुरवातीला फक्त हिवाळ्यात औषध म्हणून हे पेय प्यायले जात असे . आपल्याला आश्चर्य वाटेल, आज जगात तब्बल १५०० प्रकारचे चहा उपलब्ध आहेत. मात्र काळा, पांढरा, पिवळा आणि हिरवा हे चहाचे प्रकार प्राचीन मानले जातात. पण चहा आरोग्यावर दुष्परिणाम करतो
चहाचे दुष्परिणाम :
जगभरातील कोट्यवधी लोकांचा एक कप चहा प्यायल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. या हॉट ड्रिंक्सच्या वेड्यांची जगात मुळीच कमतरता नाही, ते दिवसातून अनेकवेळा चहाचे सेवन करतात. जेव्हा मनात येईल तेव्हा ते याचं सेवन करतात. यामुळे त्यांचे मन ताजेतवाने होते आणि शरीराला झटपट ऊर्जा मिळते हे खरे आहे. पण चहा-कॉफी आपल्या आरोग्यासाठी सदा सर्वकाळ चांगली नसते, कारण त्यात कॅफिन असते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवतात.
चहासारख्या गरमागरम गोष्टी आपल्या दातांसाठी खूप हानिकारक असतात, त्यामुळे त्यांचा रंग तर निघून जातोच, शिवाय ते कमकुवतही होतात. महिनाभर चहा-कॉफी पिणे बंद केले तर दातांचे मोठे नुकसान टळेल आणि नव्याने पांढरेपणा येऊ लागेल. चहा-कॉफी आम्लयुक्त असते आणि म्हणून दातांचे इनेमल खराब होऊ शकते. यामुळे दात खराब होतात. रिकाम्या पोटी काळा चहा घेतल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो. फार उकळून चहा प्यायल्यास अल्सरचा धोका असतो.
एखादी व्यक्ती महिनाभर चहा-कॉफीपासून दूर राहिली तर त्याच्या शरीरात कोणते बदल होऊ शकतात ठाऊक आहे का ? महिनाभर चहा-कॉफी पिणे बंद केले तर रक्तदाब नियंत्रणात येईल आणि हाय बीपीची तक्रार दूर होईल. चहा आणि सोडल्यानंतर एका आठवड्याच्या आत, आपल्या झोपेत कमालीची सुधारणा दिसेल.
चहा घेण्यापूर्वी पाणी पिणे आरोग्यदायी :
सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो ? तर कपभर चहा घेतो . अनेकांना ही सवय असते. सकाळी झोपेतून उठल्यावर चहा घेतल्याशिवाय फ्रेश वाटतच नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, रिकाम्या पोटी चहा काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच परिणाम होतो, हे अनेकांना माहीत नाही.
चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या. ही सवय आरोग्यदायी आहे. चहा घेण्यापूर्वी, पाणी पिण्या मागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील अॅसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे अॅसिडिक असतो. म्हणून जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा घेता तेव्हा अॅसिडिटी वाढते. तसंच अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची काहीशी शक्यता असते. पण आपण चहा घेण्याआधी पाणी प्यायलो तर पोटातील अॅसिडची पातळी काहीशी सौम्य होते आणि पोटाच्या व अन्य आरोग्याची हानी कमी होते. तसेच, चहाच्या अधिक अॅसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते.
चहाप्रेमींसाठी चहा अमृत आहे. त्यांना कधीही चहा द्या ते त्याला नाही असे म्हणायची हिंमतही करणार नाही. चहासोबत प्रत्येकाच्या काहीना काही आठवणी असतात. चहा बिस्कीटचा घेतलेला आनंद, टपरीवर मित्रांसोबत प्यायलेला गरम गरम चहा, कामाचा ताण घालवण्यासाठी प्यायलेला मस्त कडक चहा… चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा हवाच. चहा प्या पण जपून आणि कमीत कमी घ्या. त्यापूर्वी पाणी प्या. तरच त्याचा शरीरावर होणारा दुष्परिणाम कमी होईल, त्याची तीव्रता कमी होईल.
इति चहा पुराणं...
डॉ . राजेश इंगोले
एम.डी. पॅथॉ