संपादकीय

“निरामय”च्या सर्व वाचकांना इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! येणारे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांसाठी सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो, हीच सदिच्छा!! 

काही अपरिहार्य कारणामुळे” निरामय “चा मागचा अंक आम्ही प्रकाशित करू शकलो नाही.यासाठी आम्ही सर्व संपादकीय मंडळ मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.

आपण जगत असतो ते जगाचे आकलन करत करत. हे आकलन करण्यात मदत होते ती पंचेंद्रियांची. म्हणजे आपले कान, नाक, डोळे, त्वचा आणि जिभ. यातील त्वचेमुळे आपल्याला स्पर्शज्ञान मिळते. मानवी जीवनात स्पर्शाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.बाळ जन्माला आल्याबरोबर आईचा प्रेमळ स्पर्श व तिच्या शरीराची ऊब बाळासाठी किती आवश्यक आणि आश्वासक असते, हे आपल्याला माहीत आहेच. वय वाढत जातं तसं पुढे या स्पर्शाचे  अर्थ आणि संदर्भ बदलत असले तरी मानवी स्पर्श हा एक मौलिक असा अनुभव आहे, जो नुसता भावनिक आधार देत नाही, तर मानसिक आरोग्य आणि शारीरिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाचा आहे. "Nothing is healing as a human touch " असे म्हणण्यामागचे कारण असे की, आपण जेव्हा आजारी असतो त्या वेळेला औषधोपचाराबरोबरच मानवी स्पर्श व मानवी आधारही आवश्यक असतो. त्याशिवाय आपण त्या आजारातून लवकरात लवकर बरे होऊ शकत नाही. हाच कटू अनुभव चार वर्षांपूर्वी सगळ्या जगाने अनुभवलेल्या कोरोना महामारीच्या कठिण काळात आला. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये, म्हणून त्या काळात एकमेकांना भेटणे, स्पर्श करणे वर्ज्य होते.पण त्याचा परिणाम असा झाला की,  जे रुग्ण होते त्यांचा मानसिक ताण तणाव कमी होऊ शकला नाही, तर चिंता व उदासीनता वाढली. त्यामुळे त्यांच्या शरीराबरोबरच मानसिक व भावनिक स्वास्थ्यावरही परिणाम झाला.

निसर्गाने आपल्याला दिलेल्या पंचेंद्रियांपैकी “स्पर्श “ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपल्याला दृष्टी असेल  किंवा नसेल तरीही बऱ्याचशा गोष्टी आपण स्पर्शाने जाणू शकतो आणि जे दृष्टीहीन आहेत त्यांच्यासाठी तर स्पर्श हीच त्यांची दृष्टी आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये स्पर्शाला एक वेगळे महत्त्व आहे. डॉक्टर- पेशंट नात्यामध्ये एकमेकांवरचा विश्वास दर्शवणारा हा एक महत्त्वाचा दुवा आहे. कुठलाही पूर्व परिचय नसतानासुद्धा रुग्ण आपल्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवून शारीरिक तपासणीच्या वेळी त्यांना स्पर्श करण्याची परवानगी देतात. यामुळे डॉक्टरांना रुग्णाचे अचूक निदान करण्यास मदत तर होते व डॉक्टर - पेशंटमधील एक विश्वासाचे, आपुलकीचे व आदराचे नाते निर्माण होते. बऱ्याचदा काही रुग्णांकडून कौतुकाने आपण ऐकतो की डॉक्टरांनी हात लावताच अर्धा आजार पळून गेला म्हणून!

मनोवैज्ञानिकांच्या अभ्यासानुसार, सकारात्मक मानव स्पर्शामुळे शरीरात काही हॉर्मोनल बदल घडतात ज्यामुळे हृदयाची गती संतुलित होते व ह्रदयाचे आरोग्य सुधारते, मानसिक ताण कमी होतो आणि मूडदेखील सुधारतो. भावनिक आधार देणारा स्पर्श किंवा आलिंगन कठीण काळात आपल्याला उत्साह देतो आणि सहकार्याची भावना निर्माण करतो.

मानवी स्पर्श खरोखरच एक अतिशय सुंदर अनुभूती आहे. माणसा- माणसांना  एकत्र आणणारा,दोन व्यक्तीमध्ये  आपुलकीचे,विश्वासाचे, प्रेमाचे बंध निर्माण करणारा आणि त्यांचे आयुष्य सोन्यासारखे उजळवणारा हा स्पर्श जादुई "Midas touch "च होय ! असेच विश्वासाचे आणि आपुलकीचे नाते तयार झाले आहे डॉ. हेडगेवार रुग्णालय आणि येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये !  डॉ. हेडगेवार हॉस्पिटलने आपल्या सेवेचे बारा वर्षे म्हणजेच एक तप पूर्ण केले असून या कालखंडात रुग्णालयाद्वारे असंख्य लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले आहेत. सेवा, स्वास्थ्य, सहयोग या त्रिसूत्रीच्या आधारावर सुरु केलेल्या या कामाला सुरुवातीपासून ते आजतागायत समाजाने सहयोग, प्रेम आणि विश्वास भरभरून दिला. चिकित्सा, निदान,उपचार,शस्त्रक्रिया,प्रसूती,अती दक्षता विभाग, समुपदेशन,आरोग्य विषयक मार्गदर्शन, रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी शिबिरे, सेवा वस्ती मधे संत गाडगेबाबा फिरता दवाखाना, स्त्रियांसाठी रुग्णसेवा सदन,ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत संवेदना प्रकल्प,तसेच वृध्द आणि दुर्बल रुग्णांसाठी अक्षयवट अशा विविध पद्धतीने रूग्णांना लाभ मिळत आहे.

डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या भाराणी मेमोरियल क्रिटिकल केयर युनिट येथे अतिदक्षता विभगाबरोबरच इको, डायलिसिस, मेंदूवरील जटील शस्त्रक्रिया, एन्डोस्कोपी, ब्रोन्कोस्कोपी, ईईजी, शॉक उपचार ई.उपलब्ध आहेत.आज दोन्ही युनिट्स मिळून ५२ बेड्स, ९ स्पेशॅलिटीज, ६ सुपर स्पेशॅलिटीज, पॅथॉलॉजी लॅब, एक्स रे, २५ कन्सल्टन्ट डॉक्टर्स, २०० कर्मचारी आणि अनेक समाधानी रुग्ण असा हा खूप मोठा परिवार झाला आहे.

कोविडच्या काळात हॉस्पिटलने नाममात्र शुल्कात अनेक पेशंट्सचे होम मॉनिटरिंग केले तसेच कोविड लसीच्या जनजागृतीसाठी ऑनलाईन कार्यक्रमही घेतले, याच काळात “अक्षयवट “ या नावाने घरी जाऊन तपासण्याची सेवा हॉस्पिटलने सुरु केली. अंथरुणाला खिळलेले रुग्ण किंवा एकटेदुकटे राहणारे वयोवृद्ध नागरिक यांना हॉस्पिटलपर्यंत येणे शक्य होत नाही, अशा वेळी डॉक्टर आणि नर्स घरी जाऊन त्यांची तपासणी करतात व औषधोपचार देतात. आरोग्य विषयक महत्वाच्या विषयांवर विश्वासार्ह,सखोल पण सरळ-सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी म्हणून “निरामय “हे त्रैमासिक सुरु झाले. नियमितपणे निघणाऱ्या या त्रैमासिकाने माहितीपूर्ण आणि सरल लेखांमुळेच नव्हे तर सोबत असणाऱ्या वैचारिक आणि साहित्यिक अंगाच्या लिखाणामुळे देखील वाचकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. 

अशा कितीतरी वेगवेगळ्या उपक्रमांतून  रुग्णालय जनसेवेचे कार्य अविरतपणे करत आहे. यात डॉक्टरांएवढाच रुग्णालयातील काम करणाऱ्या परिचारिका, आरोग्य कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. या सगळ्यांच्या  अथक परिश्रमाचे  परिणामी  आज डॉ. हेडगेवार रुग्णालयामध्ये रुग्ण अतिशय आस्थेनं आणि विश्वासाने  येतात.

याचेच पुढचे पाऊल म्हणजे नव्याने होऊ घातलेली व वेगाने पूर्णत्वास येत असलेली नवीन इमारत.सुमारे दीडशे बेड्स ची क्षमता असणारी पूर्वीपेक्षा अधिक सोयी सुविधांनी युक्त अशी ही वास्तू डॉ. हेडगेवार हॉस्पिटलच्या स्वतःच्या जागेत साकार होऊ लागली आहे,जागेअभावी असणाऱ्या अनेक पद्धतीच्या मर्यादा दूर होऊन  रुग्णसेवेचे हे अखंड व्रत असेच चालू राहील असा आमचा पूर्ण विश्वास आहे.त्यासाठी आम्ही सगळे तत्पर आहोत.

निरोप घेताना निरामयच्या सर्व वाचकांचे,दानदात्यांचे,हितचिंतकांचे विशेष आभार ! “निरामय”साठी अभ्यासू, दर्जेदार लेख देणाऱ्या सगळ्या लेखकांचे देखील आभार ! आपल्या सदिच्छा आणि स्नेहामुळे आम्हाला असेच कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळते. असाच लोभ असू द्यावा.तो वृद्धिंगत व्हावा, ही विनंती. धन्यवाद !

 

डॉ. प्रज्ञा बनसोड