सण आणि मानसिक स्वास्थ्य

अंगाची काहिली करणारा ग्रीष्म संपतो अन् मन वाट पाहू लागतं तनमनाला भिजवणाऱ्या पावसाची. भेगाळलेल्या तृषार्त धरतीवर पावसाचे थेंब पडतात आणि मनात दाटून ठेलेल्या भावनांना वाट करून देत धरणी सुखावणाऱ्या मृद्गंधाने वातावरण उल्हसित करते. तिच्या गर्भात दडलेली बीजे आपल्या माना वर काढतात आणि हिरवी पाने वाऱ्यावर डोलू लागतात. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ सृष्टीला एक चैतन्यमयी, मोहक रूप प्रदान करतो. असंच काहीसं माणसांचं होतं जेव्हा नकोनकोशा ग्रीष्मानंतर मनोहारी श्रावण आपल्या सोबत सणांना घेऊन येतो. नविन सणांच्या निमित्ताने माणसे नव्याने भेटतात, स्वतःला आणि दुसऱ्यांना देखील ! 

गौरी- गणपतीच्या दिवसांमध्ये गावाकडे निघालेले चाकरमानी, मंगळागौर,रक्षाबंधनासाठी माहेरी निघालेल्या माहेरवाशिणी, नागपंचमी, पोळा साजरा करण्यासाठी उत्साहाने तयारी करणारा गावकरी, हरतालिकेला फुलापानांच्या सजावटीत आपल्या आराध्याला पुजणाऱ्या ललना... अशी कितीतरी रूपे डोळ्यापुढून सहज तरळून जातात. उत्साह, आनंद, आत्मीयता, प्रेम, सहकार्य, कलात्मकता, अशा कितीतरी सकारात्मक गुणांचा संगम या सणासुदीच्या काळात घरोघरी झालेला दिसून येतो. सकारात्मक मानसशास्त्र या विषयातील एक प्रख्यात शास्त्रज्ञ आणि मनोवैज्ञानिक मार्टिन सेलिग्मन यांनी माणसाचा आनंद नेमका कशात आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि अभ्यासानंतर त्यांना असं आढळलं की, आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी काही घटक कारणीभूत असतात. हे घटक त्यांनी म्हणजे 'परमा मॉडेल ऑफ हॅपिनेस अँड वेलबीइंग' (PERMA)च्या माध्यमातून सांगितले. PERMA प्रत्येक अक्षरापासून तयार होणारा घटक माणसाच्या जीवनाला आनंदी बनवतो. “पॉझिटीव्ह इमोशन -सकारात्मक भावना, एंगेजमेंट म्हणजे कामात गुंतून राहणे, रिलेशनशिप्स -परस्पर संबंध, मिनिंग -जीवनाचा अर्थ उमगणे, आणि अचिवमेंट म्हणजे आयुष्यातील मिळकत किंवा यश.” हे पाच घटक जीवनात असतील तर एक सुखी, समाधानी, आनंददायक व परिपूर्ण असे जीवन आपण जगू शकतो. परंतु रोजच्या धकाधकीच्या एकसुरी आयुष्यात किती जण या बाबींचा जाणीवपूर्वक विचार करू शकतात ? परंतु आपले सण, उत्सव व परंपरा हा विचार करण्याची संधी देतात. तेही अगदी नियमितपणे !

सण, उत्सव व समारंभ हे सकारात्मक भावनेशी जुळलेले आहेत. सकारात्मक भावना म्हणजे केवळ चेहऱ्यावरचं स्मितहास्य नाही तर जीवनात घडणाऱ्या घटनांकडे आणि परिस्थितीकडे सकारात्मक आणि आशावादी  दृष्टीने बघण्याची क्षमता. आनंद, कृतज्ञता, आशावाद, स्वाभिमान, प्रेरणा, प्रेम इ. सकारात्मक भावनांचा उगम आपल्यामध्ये कोणत्या गोष्टींमुळे, व्यक्तींमुळे किंवा कोणत्या वेळी होतो, याचा एकदा अंदाज बांधता आला की आपण आपले विचार या सकारात्मक भावनांवर केंद्रित करू शकतो. अर्थात हे वाटते तितके सोपे निश्चितच नाही. आयुष्य क्षणोक्षणी बदलते आणि प्रत्येकच क्षण सकारात्मकतेला पोषक असेल असे नाही. अशा वेळी महत्वाचे ठरते स्वीकारणे. प्राप्त परिस्थिती, व्यक्ती, प्रसंग जसा आहे तसा स्वीकारणे! भूतकाळात घडलेल्या किंवा सद्य:स्थितीत घडत असलेल्या नकारात्मक गोष्टींचा स्वीकार केल्यानंतर प्रत्येकच गोष्टीकडे सकारात्मक आणि आशावादी दृष्टिकोनातून पाहण्याची क्षमता विकसित होते. बऱ्याचदा सण समारंभाच्या निमित्ताने ज्या गाठीभेटी होतात त्या अशा स्वीकारातून होतात. 'जुने जाऊ द्या मरणालागूनी' म्हणत पुन्हा एकदा हरवलेल्या संवादात रंग भरू लागतात. कित्येक दिवसात, कित्येक महिन्यात झालेल्या या भेटी मनाला नवीन उभारी देतात. मनाची मरगळ दूर करतात. मानसिक थकवा घालवण्यासाठी बहिण भाऊ, मित्र मैत्रिणी, आई वडील, आजी आजोबा यांनी घातलेली प्रेमाची फुंकर एक जादू म्हणून काम करते आणि हे हवेहवेसे क्षण पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटतात.

सण समारंभाचे चैतन्यमयी वातावरण हे ताण तणाव, एकटेपणा, नैराश्य कमी करण्यास मदत करतात. दारावरचे तोरण, अंगणातली सुबक रांगोळी,देवघराची आरास, रसना तृप्त करणारे खाद्यपदार्थ, रेशमी वस्त्रांची झुळझुळ, आरतीचा उच्च स्वर, फुलांचा दरवळ, किलबिलणाऱ्या बालकांचा घर भरून टाकणारा आवाज, गप्पाच्या मैफिली व हास्याचे स्फोट असे पंचेंद्रियांना सुखावणारे वातावरण सकारात्मक लहरी निर्माण करतात. 

मानसिक स्वास्थ्याला पोषक ठरणारी दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सणासुदीच्या निमित्ताने आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनाला मिळालेला एक ब्रेक ! कंटाळवाण्या एकसुरी कामात वेळ जाता जात नाही, पण काम आवडीचे असेल तर वेळ कसा भुर्रकन उडून जातो ते जाणवत देखील नाही. सण समारंभ शरीराला व मनाला एक उभारी देतात. आवडणाऱ्या कामात शरीर आणि मन अत्यंत उत्साहाने गढून जाते. अशा वेळी आपल्या शारीरिक आणि मानसिक  क्षमता पुरेपूर वापरल्या जातात. इतर वेळी रोजच्याच कामाने थकून जाणारे आपण दहापट जास्त काम करूनही ताजेतवाने राहतो.  सणासुदीच्या निमित्ताने घराची आवरसावर असेल, रंगरंगोटी असेल, खरेदी असेल, पूजा असेल, जेवणावळी असतील, गप्पांची मैफिल असेल, मित्रांच्या भेटी गाठी असतील, धार्मिक विधी असतील...या सगळ्यांमुळे रोजच्या जीवनाच्या एकसुरीपणाला एक सुंदर अशी कलाटणी मिळते, ज्यामुळे मनाची मरगळ दूर निघून जाते. या काही क्षणांच्या आनंदोत्सवानंतर एका नवीन उत्साहाने पुन्हा कामाला लागता येते. 

माणूस हा सामाजिक प्राणी आहे. अवतीभवतीच्या व्यक्तींमुळे त्याच्या जीवनाला एक अर्थ प्राप्त होतो आणि हा आनंद देखील वाटल्यानेच द्विगुणित होतो. आनंद आणि एकटेपणा या संकल्पनाच मुळी परस्पर विरोधी आहेत! सणासुदींना झालेल्या कौटुंबिक, सामाजिक एकत्रीकरणामुळे एकसंधपणाच्या, आपलेपणाच्या, एकात्मतेच्या भावनेची जोपासना होते. या एकीकरणातून सुरक्षिततेची, प्रेमाची भावना वृद्धिंगत होते. एका सकारात्मक, आनंदी जीवनासाठी भावनांचे हे प्रगटीकरण फार मोलाचे काम करते.

आपले अवधान,आपली क्षमता पारखण्याची संधीदेखील सण प्रदान करतात. सणासुदीच्या निमित्ताने लक्ष ठेवून, आठवण ठेवून, सर्व गोष्टींची जुळवाजवळ करण्यामध्ये आपली नियोजन क्षमता,नेतृत्वगुण,शारीरिक क्षमता , अवधान या साऱ्यांचीच परीक्षा होते. देवाचा नैवेद्य तयार करण्यामागे देखील किती गोष्टींचा विचार केलेला दिसून येतो. शरीराची आणि मनाची शुचिर्भूतता, अंदाज,काटेकोरपणा, नियोजनबद्धता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम ! आपले सारे कौशल्य पणाला लावून केलेला नैवेद्य करणाऱ्याला समाधान तर खाणाऱ्याला तृप्ती देतो शिवाय  भगवंताला अर्पण केल्याशिवाय त्या पदार्थाची चव बघायची नाही,या नियमामधून मनावरचा संयमाचा संस्कार आपोआप रुजवल्या जातो. जे द्यायचे ते उत्तम असावे, दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतः घेऊ नये आणि जे काही जीवनात मिळाले आहे,त्याबाबत कृतज्ञ असावे... अशासारखी केवढी मोठी मानवी मूल्ये यायोगे आपोआप रुजतात व वृद्धिंगत होतात !

एक चांगल्या पद्धतीने साजरा केलेला सण एका अतीव समाधानाची भावना निर्माण करतो. ही भावना आत्मविश्वास वाढवण्यासाठी पोषक ठरते ज्यायोगे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो. काहीतरी मिळवल्याची ही समाधानाची भावना (अचिवमेंट) 'परमा' मॉडेलमधील शेवटचा पण अत्यंत महत्वाचा घटक आहे.

धार्मिक रूढी- परंपरा इतकाच आनंद हा देखील सण समारंभ साजरे करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे परंतु बरेचदा असे दिसून येते की रुढी, परंपरा यांच्या अट्टहासा पोटी आनंद हा भाग दुर्लक्षितच राहतो. विशेषतः मध्यमवर्गीय महिला वर्गासाठी सण समारंभ हे आनंदाचा स्त्रोत न ठरता एक दडपणाचा विषय ठरतात. स्वयंपाकघरात तासनतास काम करत घामाच्या धारात न्हाऊन निघणारी गृहिणी आणि बैठक खोलीत गप्पात रंगलेली पुरुष मंडळी हे चित्र खचितच आनंद या संकल्पनेला मारक ठरते.  कौटुंबिक,सामाजिक अपेक्षांचे ओझे, आर्थिक विवंचना, शारीरिक व्याधी इ. कारणांमुळे सणांचा आनंद उपभोगण्यापासून स्त्रिया वंचित राहतात. अशावेळी कुटुंबातील इतर व्यक्तींचा समंजसपणा आणि सहकार्य सणांना आनंददायक असे स्वरूप देण्यास उपयुक्त ठरू शकते.

आजच्या धकाधकीच्या काळात  कामाचा वाढता व्याप, वेळेची कमतरता, अपुरे मनुष्यबळ या बाबींमुळे बऱ्याचदा वडीलधाऱ्यांच्या अपेक्षांनुसार सण साजरे होत नाहीत. बरेचसे 'शॉर्टकट्स' वापरले जातात, काही गोष्टी 'स्किप' केल्या जातात.  अशावेळी 'आमच्या वेळी नव्हतं 'किंवा 'आजकालच्या पिढीला कशाची किंमतच नाही'..अशा नकारात्मक प्रतिक्रिया दण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत सर्वांच्या सहयोगाने, सर्वांना आनंद होईल,सकारात्मक बाजू वाढीस लागतील अशा पद्धतीने सण साजरा केला तर सण -समारंभ हे मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून अधिकच पोषक बनतील यात शंकाच नाही. मानसशास्त्र या विषयाचा जेव्हा उगमही झालेला नव्हता, अशा काळापासून चालत आलेल्या या परंपरा किती विचारपूर्वक निर्माण केलेल्या असतील! निसर्गाची उपासना, माणसा -माणसातील प्रेमाचे बंध, सामाजिक बांधिलकी, सहसंवेदना निर्माण करणारे आपले सण म्हणजे आपल्याला मिळालेली एक देणच आहे, नाही का ?

 

प्रा. वैशाली देशमुख