घरातल्या सर्वांचे आरोग्य छान रहावे, सगळ्यांच्या आवडीचे आणि चवीचे पदार्थ त्यांना अगदी फ्रेश मिळावे म्हणून सतत झटणारी 'ती' मात्र स्वतःच्या आवडीनिवडीकडे व स्वतःच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष करत असते. स्वतःला आवडणारी भाजी किंवा पदार्थ घरी दुसरे कोणी खात नसेल तर ती तो बनवणे टाळते परंतु सगळ्या घराचा कणा असणाऱ्या 'ति'चा आहार हा खरोखरच दुर्लक्ष करण्यासारखी साधी बाब आहे का?
स्त्रीचे शरीर हे वेगवेगळ्या हार्मोन्स म्हणजे संप्रेरकांवर अवलंबून असते त्याचबरोबर घरात सगळी कामं करत असताना बऱ्याचदा आहारातून मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे सतत थकवा येणे, दम लागणे,पाय दुखणे,कंबर दुखणे अशी एक ना अनेक दुखणी तिला होत असतात. या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत ती मात्र सतत कामात गुंतलेली असते. वयानुसार जेव्हा मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीची वेळ येते त्यावेळी मात्र हाडांची ठिसूळता, सांधेदुखी, मांस पेशी मधली कमजोरी, अशक्तपणा जास्त जाणवायला लागते आणि अचानक सगळी कामे करणे कठीण होऊन बसते.या सगळ्यांचे मूळ आहे ते म्हणजे सततचं काम, अपुरा आराम व सदोष आहार.
आजच्या शहरी भारतीय स्त्रिया कुपोषणाच्या दुहेरी ओझ्याने त्रस्त आहेत. एकीकडे प्रक्रियायुक्त पदार्थांचा वाढता वापर, अस्वस्थ जीवनशैली आणि ताणतणावामुळे जादा वजन, मधुमेह आणि उच्च रक्तदाब प्रमाण महिलांमध्ये वाढते आहे आणि दुसरीकडे त्यांपैकी निम्म्या महिला रक्तक्षयाने (कमी हिमोग्लोबिन) ग्रस्त आहेत. त्यांच्या आहाराच्या योग्य गरजांवर लक्ष केंद्रित न केल्याने तसेच अपुऱ्या प्रमाणात किंवा कमी गुणवत्तेचे अन्न खाल्ल्याने महिलांमध्ये कुपोषण होते.
तुम्ही जेवताना काय खाता,यावर तुमचे भविष्यातील आरोग्य अवलंबून असते. आपल्या प्लेटमध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्याने आपले शरीर निरोगी राहते आणि वय-संबंधित आरोग्य समस्या विकसित होण्याचा धोका कमी होतो. गर्भावस्था व स्तनपान करताना आपण आहाराकडे विशेष लक्ष देतोच पण त्याव्यतिरिक्त किशोरवयीन मुली आणि पन्नाशीच्या सुरुवातीच्या काळात, महिलांनी त्यांच्या आहाराकडे जास्त लक्ष दिले पाहिजे कारण या काळात शरीरात अनेक हॉर्मोनल बदल होत असतात. किशोरवयीन मुली या तर भविष्यातील माता असून ही जबाबदारी पेलण्यासाठी त्यांचा एकंदरीतच आहार हा पौष्टिक असायला हवा.
प्रत्येक स्त्रीने नियमितपणे आहारात समावेश करावेत असे ७ पोषक घटक आहेत.
१) फोलेट :
हृदयाचे आरोग्य, मज्जातंतूचे कार्य, स्नायूंचे आरोग्य, ऊर्जा उत्पादन, पचन, रक्त पेशींचे कार्य, भूक नियमन, डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेचे आरोग्य यासाठी फोलेट आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान बाळामध्ये मेंदू, मज्जातंतू आणि पाठीच्या कण्यातील जन्मजात दोषांचा धोका कमी करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे .
समृद्ध स्रोत: ब्रोकोली, चणे, हिरव्या पालेभाज्या.
२) लोह :
हार्मोनल संतुलनासह शरीराच्या विविध कार्यांसाठी लोह आवश्यक आहे आणि शरीराच्या ऊतींमध्ये ऑक्सिजन वाहतूक करण्यास मदत करते. चांगल्या शोषणासाठी व्हिटॅमिन सी समृध्द पदार्थांसोबत खा.
समृद्ध स्रोत: राजगिरा, मनुका, मसूर, गूळ,सोयाबीन, तीळ, हिरव्या पालेभाज्या, बीट ई.
३) कॅल्शियम :
निरोगी हाडे, दात, स्नायूंचे कार्य, रक्तवाहिन्यांचे आकुंचन आणि विस्तार, मज्जातंतूंचे संक्रमण आणि हार्मोनल संतुलनासाठी कॅल्शिअम आवश्यक आहे.
समृद्ध स्रोत: नाचणी, पनीर, राजगिरा, बथुआची पाने, तीळ,दूध व दुग्धजन्य पदार्थ .
४) व्हिटॅमिन डी :
व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात हार्मोनसारखे काम करते. ते यकृत आणि मूत्रपिंडांद्वारे जैविक दृष्ट्या सक्रिय कॅल्सीफेरॉलमध्ये रूपांतरित केले जाते, तेव्हा ते आतड्यांना अन्नातून अधिक कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते.
समृद्ध स्रोत: व्हिटॅमिन डीचा सर्वात सोपा स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश. इतर स्त्रोत, अंड्यातील पिवळ बलक, मशरूम
५) व्हिटॅमिन ई :
अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते आणि रोग प्रतिकारशक्ती, हार्मोनल संतुलन करण्यास मदत करते.
समृद्ध स्रोत: बाजरी, चवळी, आंबा, नारळ, फ्लेक्ससीड्स, अक्रोड
६) मॅग्नेशियम
प्रथिने पचन, रक्तदाब नियमन, रक्तातील साखरेचे नियंत्रण आणि मज्जातंतू आणि स्नायूंच्या कार्यामध्ये गुंतलेल्या विविध एन्झाईम्सच्या कृतीमध्ये मदत करते.
समृद्ध स्रोत: केळी, एवोकॅडो, हिरव्या पालेभाज्या, अंजीर, ज्वारी
७) ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् :
पेशींच्या संरचनेतील हा घटक हृदय, रक्तवाहिन्या, मेंदू, डोळे, फुफ्फुसे आणि हार्मोन्सचे निरोगी कार्य राखण्यास मदत करतो.
समृद्ध स्रोत: तूप, एवोकॅडो, ऑलिव्ह तेल, अक्रोड, चिया सिड्स.
सखींनो,या बरोबरच आहारात गोड, कॅफेन, चरबीयुक्त पदार्थ, पॅकेज्ड फूड ई.चा कमीत कमी समावेश असावा.
घरातल्या सर्वांची काळजी घेत असताना स्वतःच्या आरोग्याकडे व आहाराकडे वेळीच लक्ष द्या .
योग्य जीवनशैलीचा अंगीकार करा, कारण ' ती ' निरोगी तर सगळे घर निरोगी.
प्रतिक्षा ठोसर