आजोबा दवाखान्यात आले तेव्हा काळजीत होते. त्यांना वरवर पाहता मोठा आजार सुदैवाने नव्हता. पण अलिकडे आपल्याला लक्षात राहत नाही, ही त्यांची तक्रार होती. यामुळे त्यांना स्वत:ला ओशाळल्यासारखे होत होते. शिवाय घरचे वैतागले होते. पण वयाला इलाज नाही. वाढते वय कोण थांबवू शकतो ? ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्याने या विषयावर चर्चा होणे अगत्याचे आहे. आजोबांना समजावलं, घाबरू नका. वेळीच आले तर गुण येऊ शकतो. कुटुंबियांना देखील या आजाराचे गांभीर्य सांगितले. यात आजोबांचा काहीच दोष नाही. ते मुद्दाम काही करीत नाहीत. तर वाढत्या वयात अनेक आजार होण्याची शक्यता असून यातील एक अल्झायमर आहे. अल्झायमर हा आजार प्रामुख्याने व्यक्तिची स्मृती, आकलनशक्ती आणि दैनंदिन कार्य बिघडवतो . मेंदूमध्ये बीटा-अमायलोइड प्लेक्स आणि टाऊ टँगल्स या दोन प्रथिनांचा असामान्य संचयन झाल्याने हा आजार होतो. ही प्रथिने तयार होण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हे खरे आहे की, अल्झायमर हा जटील आणि विनाशकारी न्युरोडीजनरेटिव्ह आजार आहे. हा आजार जगभरातील लाखो लोकांमध्ये दिसून येतो.
अल्झायमर आजाराची लक्षणे:
अल्झायमर रोगाची लक्षणे सहसा स्मरणशक्ती कमी होण्यापासून सुरू होतात. यात पुढे स्मरणशक्ती कमी होणे, अगदी अलिकडील घटना आणि संभाषणे लक्षात ठेवण्यात अडचण निर्माण होणे अशी लक्षणें होतात तसेच अल्झायमर असलेल्या व्यक्ती विचलित होऊ शकतात. ते वेळेचा मागोवा व्यवस्थित घेवू शकत नाहीत. यामुळे परिचित ठिकाणे किंवा लोकांना ओळखण्यात समस्या निर्माण होऊ शकते. नेमका शब्द , नावे विसरणे, योग्य शब्द शोधण्यात, संभाषणाची सुरुवात करणे किंवा त्यात सहभागी होणे कठीण होते आणि सुसंगतपणे लिहिण्यातसुध्दा अडचण येऊ शकते. अल्झायमरमुळे निर्णय घेण्याची क्षमता कमकुवत होते त्यामुळे या व्यक्ती संभ्रमित होतात.
व्यक्तिमत्त्वातील बदल:
अल्झायमरच्या रुग्णांमध्ये मूड स्विंग, चिडचिडेपणा आणि व्यक्तिमत्त्वात होणारे बदल सहज ओळखू येणारे आहेत.हा आजार जसजसा वाढत जातो, तसतसे व्यक्तिंना अंगावर कपडे घालणे, अंघोळ करणे आणि स्वयंपाक करणे यासारखी नित्य कार्ये करण्यासाठी त्रास होऊ शकतो. एव्हढेच नाही तर नियमित पणे पाणी पिणे सुद्धा ते विसरतात ज्यामुळे त्यांच्यात dehydration म्हणजेच निर्जलीकरण होण्याचा धोका वाढतो.
अल्झायमर्स हा डिमेंशिया या सिंड्रोमचा एक प्रकार आहे. डिमेंशियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. मात्र, या सगळ्या प्रकारांमध्ये व्यक्तीच्या स्मृतीवर (Memory) परिणाम होतो. स्मृतीभ्रंश म्हणजे विसरभोळेपणा. बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलविणे, चालणे, जेवणे, स्वच्छतेच्या क्रिया हे सगळं मेंदुतल्या काही पॉईंट्समधून नियंत्रित होत असतं. अशा वेगवेगळ्या पॉईंट्सना जेव्हा इजा होते तेव्हा शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो. अल्झायमर्समध्ये जसजसं वय वाढतं तसा मेंदूचा आकार लहान होत जातो. मेंदुतल्या वळ्या कमी होत जातात. यामुळे विसरभोळेपणा येतो. अल्झायमर झालेल्या व्यक्तींना काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टींचा विसर पडतो. रुग्ण घराच्याच व्यक्तींना ओळखत नाही किंवा ओळखलं तर दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ओळखतात. चेहरा बघून आपण या व्यक्तीला ओळखतो असं त्यांना वाटतं. पण नाव आठवत नाही. घरचा पत्ता आठवत नाही. पाठ असलेले मोबाईल नंबर आठवत नाही. या स्टेजपर्यंत उपचार मिळाले नाही तर रुग्णांना दिवस आहे की रात्र, तारीख, महिना, वर्ष हे सुद्धा लक्षात राहत नाही . तो रुग्ण पूर्णपणे इतरांवर अवलंबून राहतो.
क्लिनिकल चाचण्या:
अल्झायमरवर सध्या जगभरात संशोधन चालू असून संभाव्य उपचार आणि अधिक अभ्यास व शोध सुरू आहे. क्लिनिकल चाचण्या केल्याने अत्याधुनिक उपचार होऊ शकतात. हा ज्येष्ठ नागरिकांना होणारा आजार आहे. तेव्हा वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाना दर सहा महिन्यांनी ब्लड टेस्ट करायला हवी. रुटीन चेकअप , लिव्हर प्रोफाईल, किडनी प्रोफाईल, व्हिटॅमिन बी- १२ , व्हिटॅमिन डी यांची टेस्ट करायला हवी.
अल्झायमर्स या रोगाचे नाव डॉ. अलोईस अल्झायमर यांच्या नावावरुन आले. मेंदूच्या विचित्र आजारपणामुळे मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या मेंदूतील पेशींमध्ये बदल डॉ. अल्झायमर यांनी १९०६ साली अभ्यासले होते. स्मृतिभ्रंश, बोलताना अडथळे येणे, लहरी वर्तन अशी लक्षणं त्या महिलेमध्ये दिसून आली होती. मृत्यूनंतर तिच्या मेंदूची तपासणी केल्यानंतर डॉ. अल्झायमर यांना तिच्या मेंदूत गाठी, तंतुंच्या गाठी दिसून आल्या होत्या.
या आजाराला अनेक कारणे आहेत.
१) एकटेपणा : वृद्ध हे अनेकदा समाजापासून दुरावतात .त्यांची लोकांमधली उठबस, संवाद कमी होतो किंवा इतर निवृत्ती, शहर किंवा देश बदलणे, यासारख्या कारणांमुळे आलेला एकटेपणा यामुळेही अल्झायमर होऊ शकतो.
२) हृदयाशी संबंधित आजार : मधुमेह, रक्तदाब यासारख्या हृदयाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींना हा आजार होऊ शकतो.
३) ब-जीवनसत्त्वाची कमतरता : शाकाहारी खाद्य संस्कृतीमुळे आपल्या जेवणात ब जीवनसत्त्वाची कमतरता असते. विशेषत: महिलांमध्ये आणि अल्झायमर होण्याचं हेदेखील एक कारण आहे.
४)जीवनशैली घटक: चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान आणि जास्त मद्यपान यामुळे अल्झायमरचा धोका वाढू शकतो.
अल्झायमर्स हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण, काही औषधं आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. म्हणजे तो वाढत नाही. त्यामुळे सुरुवातीच्या स्टेजमध्येच रुग्णाला योग्य उपचार मिळाले तर रुग्णाला १०-१५ वर्ष किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येतं.
जीवनशैलीतील बदल:
संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि सामाजिक कामात गुंतवून घ्या. तसेच जीवनशैलीत बदल केल्याने मेंदूचे आरोग्य राखण्यात आणि अल्झायमर आजाराची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते. यासाठी प्रशिक्षण आणि व्यावसायिक थेरपी विकसित झाली आहे. अल्झायमरच्या रूग्णांना अनेकदा आधाराची आवश्यकता असते. अशा वेळी प्रसंगी काळजी घेणारे सहाय्यक गट आणि तज्ञ संस्थांकडून मदत घेता येते. मानसोपचार तज्ज्ञ आणि न्यूरोलॉजिस्ट या रोगाचं निदान करतात. आजाराचं निदान करण्यासाठी एक प्रश्नावली असते. त्या प्रश्नाची उत्तरं घेतली जातात. त्यावरून एखाद्याला डिमेंशिया आहे का, हे शोधता येतं. याशिवाय, MRI करूनही या आजाराचं निदान करतात.
अल्झायमर रुग्णांची काळजी कशी घ्यावी?
अल्झायमर झालेला रुग्ण गोष्टी विसरतो. त्यामुळे त्याला वारंवार गोष्टी लक्षात आणून द्याव्या लागतात. हे करताना सर्वात महत्त्वाचा ठरतो तो संयम. अल्झायमर रुग्णाला प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते. अल्झायमरचा रुग्ण म्हणजे लहान बाळ. त्यांना शांतपणे प्रत्येक गोष्ट सांगणं गरजेचं असतं. रुग्णाचं मानसिक खच्चीकरण , तिरस्कार करणे, थट्टा-मस्करी करणे योग्य नाही. त्यांना कुटुंबाच्या आणि एकूणच समाजाच्या पाठिंब्याची गरज असते.
पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत घरी कुणीतरी सतत असायचं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसांची, रुग्णांची काळजी घेतली जायची. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंब झालेली आहेत. स्त्रियासुद्धा घराबाहेर पडल्या आहेत. घरं छोटी झाली आहेत. अशा वेळी अल्झायमर झालेल्या व्यक्तीचा सांभाळ करणं फार अवघड होतं. हा खूप खर्चिक आजार आहे. औषधे , सोबतीसाठी केअर टेकर, डायपर.. अनेक गोष्टी. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करता येत नाही. कारण विसरभोळेपणा व्यतिरिक्त कुठलाही शारीरिक त्रास त्यांना नसतो. त्यामुळे ते घरीच त्यांचा सांभाळ करताना संयम ठेवणे महत्वाचे असते. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक असं कुठलंही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा कुणालाही हा आजार होऊ शकतो. कोणी असे मुद्दाम वागत नाही.अल्झायमरचा आजार ही एक आव्हानात्मक स्थिती आहे. हा आजार केवळ व्यक्तीच नव्हे तर त्यांचे कुटुंब आणि संबंधीत लोकांना प्रभावित करतो. अल्झायमरवर निश्चित इलाज नसला तरी त्याची कारणे समजून घेणे, वेळीच त्याची लक्षणे ओळखणे आणि उपलब्ध उपचाराच्या मदतीने या आजाराने प्रभावित लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होऊ शकते. यासाठी गरज लागल्यास तज्ञांचा सल्ला वेळीच घ्या.
वनिता राऊत
समुपदेशक, अमरावती