साधारणपणे आठवी नववीत विद्यार्थी गेले कि घरच्यांचे आणि सग्या सोयऱ्यांचे अपेक्षा आणि प्रश्न सुरु होतात; काय.... डॉक्टर कि इंजिनियर? त्यात जर घरी डॉक्टरकिचा वारसा असेल तर मग पुढील वाट जवळपास निश्चित असते. मग आमचा किंवा आमची सोनु अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या (VIP) श्रेणीत जाऊन बसतात. बाळा ! तू फक्त अभ्यास कर......बाकीचे आम्ही संभाळून घेऊ. काय हवे नको ते अगदी बसल्या जागी मिळेल. मुखातून फक्त उच्चारण्याचा अवकाश कि लगेच हातात हवी ती वस्तू उपलब्ध ! अहो....सोनुला काम नका सांगू.....परीक्षा आहे ! क्लास आहे ! मग सोनु पण मन लावून अभ्यास करतो. जीवापाड मेहनत घेतो. घरात मंगल कार्य असो, शेजारी काही कार्यक्रम आहे, नातेवाईकांमध्ये उठबस तर दूरच, देशात किंवा सामाजिक संबंधातील काही घटना घडल्या तरी सोनुला त्याचे सोयरसुतक असण्याची सुतराम शक्यता नाही ! इतके हे विद्यार्थी एका कोशात गुरफटलेले असतात. त्या विद्यार्थ्यांना घरचे लोक असे काही जपतात कि जशी हि “लुप्तप्राय प्रजाती” (endangered species) असावेत. काही अपवाद वगळता सर्वसाधारण कुटुंबांमधील हीच कहाणी. असे हे भावी घडणारे डॉक्टर विद्यार्थी समाजापासून नाळ तुटलेले असतात.
आणि मग सगळ्यांच्या मेहनतीला फळ येते..... सोनुला वैद्यक क्षेत्रात प्रवेश मिळतो. सोनु एका नव्या दुनियेत प्रवेश करतो. आता हि नवी दुनिया देखील बाह्य जगतापासून वेगळी झालेली असते. मेडिकल कोलेज, होस्टेल, मेडिकल चा अवाढव्य अभ्यास, तेथीलच जीवनात सोनु पूर्णपणे गुंतून जातो.....इतका कि त्याला जणू विसरच पडतो कि आपण ज्या समाजातून आलो त्याच समाजात आपल्याला परत जायचे आहे. समाज देखील सोनुला एकतर पूर्णपणे विसरलेला असतो किंवा त्याबद्दल अवास्तव अपेक्षांचे ओझे तरी वाढवत असतो. आमचा सोनु डॉक्टर होणार आणि परत येऊन आमची सेवा करणार इत्यादी !
पाच वर्षांचे पदवी शिक्षण, त्यानंतर एक वर्षाची सक्तीची सरकारी नोकरी, पुन्हा प्रवेश परीक्षा, मग पदव्युत्तर शिक्षण तीन वर्षे; पुन्हा एक वर्ष सरकारी नोकरी, सुपर स्पेशलायझेशन करायचे असल्यास अजून एक प्रवेश परीक्षा आणि मग तीन वर्षे आणखी शिक्षण ! असा साधारणपणे १२ ते १५ वर्षांचा शैक्षणिक प्रवास केलेला सोनु मग वयाच्या तिशी पस्तीशी पार झालेला असतो. त्यात घरच्यांची अपेक्षा आणि घालमेल कि अजून संसार थाटलेला नाहीये..... वय वाढत चालले. कसे होणार? याच सुमारास मग वर-वधु संशोधन सुरु होते. त्यातही आपला/आपली सोनु डॉक्टर; मग स्थळ सुद्धा डॉक्टरच हवे ना ! असे होता होता डॉक्टर नवरा बायकोची जोडी जमते. दोघेही मेडिकल मधूनच आलेले त्यामुळे जवळपास एकसारखी घडवणूक झालेले.
आता ओढ असते ती नवीन हॉस्पिटल “टाकायची”, “प्रॅक्टिस सेट” करायची. अशा सगळ्या प्रथामिकते मध्ये सोनु कामाला लागतो. प्रायव्हेट प्रॅक्टिस कशी करायची याचे धडे सोनुला त्याच्याच आजू बाजूला असलेल्या त्याच्या सिनिअर डॉक्टरांकडून मिळतात. हे प्रायव्हेट प्रॅक्टिसचे बाळकडू म्हणजे बँकेचे लोन घेणे, प्रचंड गुंतवणूक करून छानसे हॉस्पिटल व त्यावर आपले घर अथवा बंगला बांधणे. मग केलेल्या गुंतवणुकीच्या परतफेडीचे चक्र सुरु होते. ते कोठून फेडणार तर रुग्णांकडून मिळणाऱ्या मोबदल्यातून. मग रुग्ण होतो गिऱ्हाईक आणि डॉक्टर होतो व्यावसायिक.
वैद्यकीय व्यवसाय हा सेवा क्षेत्राशी संबधित मानला जातो. वैद्यकीय व्यवसायाचे एक वैशिष्ट्य असे कि हा व्यवसाय असला आणि यातून आर्थिक व्यवहार होत असले तरी यात मानवीय संबंधांची खूप नाजूक अशी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. डॉक्टर म्हटले कि समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन इतर व्यावसायिकांपेक्षा खूपच वेगळा असतो आणि अपेक्षाही वेगळ्या असतात. व्यवसाय, आर्थिक व्यवहार आणि मानवीय संबंध यांची सांगड घालत समतोल कसा साधता येईल यासाठी वैय्यक्तिक पातळीवर ‘डॉक्टर’ या व्यक्तीची आजन्म कसरत सुरु असते. मग काही प्रसंगी समतोल ढळला तर समाजाकडून टोकाच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात:
“वैद्यराज नमस्तुभ्यं यमराजसहोदरः l
यमस्तु हरति प्राणान वैद्यो प्राणान् धनानि च ॥
दुर्दैवाने रुग्णाचे काही बरेवाईट झाले किंवा ज्या मानवीय चुका होतात त्याला प्रतिसाद म्हणून मग डॉक्टरला थेट यमराजाचा बंधू मानण्यास समाज मागेपुढे पाहत नाही ! तेच दुसऱ्या टोकाला डॉक्टरांप्रती इतका पराकोटीचा भक्तीभाव दाखवायचा कि:
“शरीरे जर्जरीभूते व्याधिग्रस्तेा कलेवरे।
औषधं जान्हवीतोयं वैद्यो नारायणो हरिः॥“
जेव्हा एखाद्या व्याधीमुळे रुग्ण मेटाकुटीला आला असतो आणि त्यातून कसेही करून त्याला बरे व्हायचे असते तेव्हा तो डॉक्टरकडे साक्षात देवाचा अवतार असल्यासारखा नतमस्तक होतो.
अशा प्रकारच्या वातावरणात वैद्यकीय विद्यार्थी म्हणून आणि भावी वैद्यक घडविण्याच्या काळात त्यांच्यावर काय प्रभाव पडत असेल याचा विचार समाजाकडून केला जातो का? कारण आजचा वैद्यकीय विद्यार्थी तोच उद्याचा प्रॅक्टीसिंग डॉक्टर असणार आहे. मग त्यांना त्यांच्या घडविण्याच्या काळातच जर भविष्यातील या आव्हानांचा सामना करण्यासाठी योग्य रीतीने तयार केले तर काही अंशी आपण समाज आणि वैद्यक यांच्यातील संघर्ष, गैरसमज, अवास्तव अपेक्षा यावर काही प्रमाणत तोडगा काढू शकू का? अशा अनेक प्रश्नांच्या मंथनातून एक चळवळ उभी राहिली. वैद्यकीय क्षेत्रातील मुलभूत घटक जो कि वैद्यकीय विद्यार्थी आहे त्याला त्याच्या घडण्याच्या काळात गाठायचे आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून (Psycho-Social Behavioural Therapy) सामाजिक संवेदना आणि जाणीवा (social sensitization) जागृत ठेवण्याचे काम “सेवांकुर” करीत आहे.
विदर्भातील सेवांकुर चे कार्य २००८ सालापासून सुरु आहे. अमरावती, नागपूर, यवतमाळ येथून सुरु झालेले हे कार्य आता विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यातील विविध मेडिकल कॉलेज मध्ये पोचलेले आहे. MBBS, डेंटल, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि इतर पॅरा मेडिकल कोर्सेस चे विद्यार्थी यात सहभागी असतात.
एक तर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वेळापत्रक इतर प्रोफेशनल कोर्सेस पेक्षा वेगळे असते, आणि त्यांच्या बौद्धिक गरजा, वैचारिक बैठक यात बरेच वेगळेपण असते. यासर्वांचा विचार करून सेवांकुर तर्फे एक विशिष्ट कार्यपद्धतीचा अवलंब केला जातो. सेवांकुर ची कार्यपद्धती एका त्रिसूत्री वर आधारित आहे: संपर्क, संस्कार आणि सेवा. विद्यार्थ्यांसह संपर्क करून त्यांना संस्कारित करणे आणि त्याद्वारे भाव जागरण करून सेवाकार्यासाठी उद्युक्त करणे. संपर्क हा सेवांकुर च्या कार्याचा आत्मा आहे ! सहज संपर्काद्वारे विद्यार्थ्याना जोडण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. ज्याद्वारे विद्यार्थ्यांसह ओळख होते. यातून एक संपर्क साखळी तयार होते:
• अपरिचित व्यक्तीला परिचित बनविणे
• परिचित व्यक्तीला मित्र बनविणे
• मित्राला कार्यकर्त्या मध्ये परिवर्तीत करणे.
संपर्काचे उपक्रम:
होस्टेल वर सहज भेटी, डॉक्टर्स-विद्यार्थी वार्तालाप, परीक्षांसाठी शुभेच्छा, सेवांकुरच्या कार्यक्रमांसाठी निमंत्रण देण्यासाठी संपर्क, कॉलेज मध्ये सेवांकुर परिचय वर्ग. २५ डिसेम्बर ते १२ जानेवारी हा संपर्क पखवाडा म्हणून सेवांकुर तर्फे विद्यार्थ्यांना भेटण्याचा उपक्रम केला जातो. (२५, २६ आणि २७ डिसेम्बर याच तीन दिवसात स्वामी विवेकानंदानी कन्याकुमारी येथील श्रीपाद शिलेवर साधना केली होती. या साधनेच्या फलश्रुतीतूनच स्वामीजींना त्यांच्या जीवनकार्याची दिशा प्राप्त झाली. तर १२ जानेवारी हा स्वामीजींचा जन्मदिवस तर अशा दोन महत्वाच्या दिवसांच्या मध्ये संपर्काचा उपक्रम केला जातो.)
अशाप्रकारे सेवांकुरच्या संपर्कात आलेले विद्यार्थी विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कारित होतात. या उपक्रमांमध्ये काही नित्य उपक्रम म्हणजे अगदी नियमित पणे चालणारे जसे कि साप्ताहिक किंवा मासिक मिलन (एकत्रीकरण). या एकत्रीकरणाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या अभ्यासेतर (extra-curricular) माहिती, व्यक्तिमत्व आणि अनुभव यात भर पडेल अशा कार्यक्रमांची रचना केली जाते. उदा. वाचन-मनन (विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर वाचलेल्या पुस्तकांचे सारांश सदर करणे वा त्यावर चर्चा).
नैमित्यिक कार्यक्रम:
राष्ट्रीय युवक दिन १२ जानेवारी: - स्वामी विवेकानंद जयंती, उन्हाळ्यात आमरस पार्टी, वर्षा सहल, प्रकल्प भेट, रक्षाबंधन (समाजातील दीन दुबळ्या जनांना भेटून त्यांना रक्षा सूत्र बंधने व त्यांच्या सुरक्षेची, काळजी वाहण्याची जबाबदारी घेणे), दिग्विजय दिवस – ११ सप्टेंबर (स्वामी विवेकानंदानी शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत व्याख्यान दिले तो दिवस), कोजागिरी, दीपावली मिलन अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांसह विद्यार्थ्यांना समाजासोबत आणि संस्कृतीसोबत जोडून ठेवण्याचे काम सेवांकुर करीत असते.
वार्षिक उपक्रम:
दोन किंवा तीन दिवसीय निवासी शिबीर – सेवांकुर सोबत नवीन जुळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. यामध्ये विविध सामाजिक प्रकल्प स्थानी विद्यार्थ्यांचा निवास ठेवला जातो. जेणेकरून त्यांना सामाजिक प्रकल्पाची प्रत्यक्ष माहिती मिळते. गाव खेडे किंवा वनवासी जीवनाचा जवळून परिचय होतो. तसेच या शिबिरात सत्रांची रचना अशाप्रकारे केली जाते कि ज्या द्वारे शारीरिक तसेच बौद्धिक क्षमता वर्धन होईल. सामाजिक प्रश्नाच्या विषयांवर गटचर्चा केली जाते. समूहात राहून कार्य करण्यची भावना वृद्धिंगत होते.
कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग –
सेवान्कुर च्या विद्यार्थ्याना प्रशिक्षित करून कार्यकर्ता म्हणून त्यांची जडणघडण होण्यासाठी. यातून वैद्यकीय क्षेत्रातील सामाजिक जाणीवेने आणि राष्ट्रीय भावनेने ओतप्रोत असलेले तरुण कार्यकर्ते घडतात जे भविष्याचे नेतृत्व करतील.
अशा उपक्रमांच्या माध्यमातून संस्कारित झालेले तरुण वैद्यकीय क्षेत्रात सेवा भावनेने कार्य करण्यास उद्युक्त होतात हा सेवांकुर चा प्रत्यक्ष अनुभव आहे. हीच सेवांकुर ची उपलब्धी आहे..... !
न त्वहं कामये राज्यं न मोक्षं न पुनर्भवम् l
कामये दु:खतप्तानां प्राणीनाम आर्तिनाशनम् ll
डॉ. यशोधन बोधनकर